सावधान!


 बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशी माणसे भेटतात जी आपल्या काहीच कामाची नसतात. ती फक्त आपल्या भाबड्या स्वभावाचा उपयोग करण्यासाठी आपल्या आसपास असतात. जर कधी आपल्यावर काही संकट आले, किंवा त्यांच्याकडून आपल्याला काहीशी मदत होणार असेल, तर ही माणसे खुशाल हात वर करतात. पुन्हा स्वतःचा दीडशहाणपणा ही सोडत नाहीत.

असल्या लोकांना योग्य जागेवर ठेवायचे असेल, स्वतःचे पैसे, आत्मसन्मान, आणि प्रकृती जपायचे असेल, तर समंजस, सालस, समजूतदार, आणि प्रेमळ माणसाने काय करावे? भांडणं करून, संताप करून काही एक लाभ होत नसतो. 

तर शहाण्या माणसाने करण्याचे इतकेच उरते:

१. असल्या स्वार्थी लोकांत उठणे - बसणे त्वरित थांबवले पाहिजे. आधी भेटण्याचे प्रमाण कमी करून, लवकरात लवकर स्वतःस आणि स्वतःच्या कुटुंबास असल्या लोकांपासून कायमचे दूर नेले पाहिजे.

२. कामापुरते हसून, बोलून, बऱ्या बोलाने लांब जाणे, हा उत्तम पर्याय.

३. यांच्याशी कोणताही पैशाचा व्यवहार आवर्जून टाळावा. पण खरे म्हणजे कोणताही व्यवहारच टाळावा.

४. ज्यांना आपली किंमत नाही अशांचे काय लोणचे घालायचे? आणि ज्यांचा आपल्याला उपयोग नाही त्यांचे काय पापड घालायचे?

अर्थात, प्रेम, मैत्री, सदिच्छा इत्यादी कुणाचा उपयोग बघून वाटण्याच्या गोष्टी नाहीत. त्या तर खिरापत वाटप समजून करण्याच्या गोष्टी आहेत. परंतु आजच्या काळात तितके मोठे मन मात्र एखाद्या झाडाचे च असू शकते. आणि तुमच्या - माझ्यात काही तेवढे माहात्म्य नक्की नाही.

शेवटी, माणूस माणसावर अवलंबून असतोच. म्हणून आपण एकमेका जवळ अपेक्षा ठेवत असतो. अपेक्षा न ठेवून चालत नाही कारण कोणी कितीही मोठ्या मनाचा असो किंवा गडगंज पैसेवाला असो, अपेक्षा ठेवल्याशिवाय जगण्यात मजा काय?

पण आपल्यातली काही हावरट, स्वार्थी, आणि हरामखोर जनावरे इतरांचा विचार न करता स्वतःचे स्वार्थ पुरवण्यात इतके गर्क असतात कि त्यांच्यामुळे आपले आणि आपल्या पोराबाळांचे मोठे नुकसान होवू शकते. 

ही जनावरे आपल्याजवळ फरमाइश करताना काहीही वाटेल ते मागत असतात.

"तुमची जरा गाडी द्या न ...", "तुमचा नेटफ्लिक्सचा पासवर्ड द्या न ...", "वहिनींना महिनाभर हॉस्पिटलात पोचवा न ..." "आमच्या शेंबड्याला फुकटात शिकवा न ..."

अरे! म्हणजे यांच्या गरजा पुरवताना आपण पुरते संपून जायचे, आणि यांचा आपल्याला कधीच कोणताही उपयोग होणार नाही हे तर जणू विधिलिखित!

असल्या हारमखोर, हावरट, आणि निर्लज्ज लोकांना धारेवर धरून बरोबर त्यांच्या जागेवर ठेवणे अत्यंत गरजेचे असते.

आपण आपला कमी, आपल्या पोराबाळांचा विचार अधिक करतो. ही रानटी पिशाचे स्वतः खेरीज कुणाचाच विचार करीत नसतात. यांना माफ करणे सुद्धा अत्यंत धोक्याचे ठरू शकते.

मी काही कुणाला सल्ले वगैरे देत नाही. तसा माझा स्वभाव नाही. 

मी फक्त "सावधान" म्हणू शकतो.


  🙏




Comments

Popular posts from this blog

53 वर्षीय जिवाची तार

The Ladies and Me

प्रेम कसे करावे