ओम विश्वरुपाय नमः
लाडकी माणसे भेटून जातात ती काही आपल्या आयुष्यात टिकत नाहीत. पण नको ते वाहियात आणि निरर्थक लोक उगाच आपल्या उरावर चीटकून असतात.
एकतर हे असे असते किंवा आपल्या दृष्टीत काही गोष्टी येत नाहीत आणि आपण अजाण रहातो.
बरं, आपण स्वतः प्रामाणिक राहण्याचा, प्रेमळ आणि निस्वार्थ भावनांचा कितीही सत्कार केला, तरी आयुष्यात नको तेच होते, नको त्याच माणसांत आपण अडकतो. इतर कुणालाही आपल्या सारखे भाबडे, प्रेमळ, सालस वगैरे रहाण्यात काहीच रुची नसते. त्यांना जगाने चांगलेच चतुर, हरामी, निर्दयी वगैरे बनवून टाकलेले असते.
मग आपण स्वतःस मूर्ख ठरवून गप बसावे की आणि काही करायचे -- हा अत्यंत भांडावून सोडणारा प्रश्न.
मग एके दिवशी आपल्यालाच आपले समजते की -
१. आपला मूळचा स्वभाव काही आपण बदलू शकत नाही, कारण तो अनेक प्रभाव आणि घटकांनी घडलेला असतो.
२. आपण आपल्या मूळ स्वभावाशी प्रामाणिक रहाणे अत्यंत गरजेचे असते. खरे म्हणजे स्वभाव सोडून इतर काही करणे शक्यच नसते.
३. म्हणूनच आपण स्वतःचा स्वभाव, प्रकृती, अंतरमन, आणि संस्कार - यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. त्या सन्मान भावनेत हे सुद्धा माहीत असले पाहिजे कि आपल्याला आपल्याच मनाचा आदर वाटावा असे काय दडले आहे त्यात.
आणि ते जर माहीत नसेल तर आवश्यक श्रम करून ती माहिती स्वतःच मिळवून घेणे फार महत्त्वाचे वाटते.
जरी जगात आपल्या अदर्शांना स्थान नसले तरी सुद्धा हट्टाने ते आदर्श आपण सांभाळून ठेवले पाहिजे.
नवीन पिढ्या काही वेगळेच सूर लावत असल्या तरी आपण आपल्या गुणधर्माशी प्रामाणिक राहिलेच पाहिजे असे वाटते.
कदाचित आपण चुकत असू, आणि जगाने दाखवलेला स्वार्थी, स्वच्छंदी जगण्याचा मार्गच योग्य असावा.
कदाचित आपण प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूवर लोभाची, वासनेची नजर टाकायला हवी आणि आवडेल ती वस्तू हस्तगत करण्याची कुवत आणि हेतू पाळायला हवेत. कारण प्रेम, निस्वार्थ भावना, वगैरे कमकुवातीची प्रमाणे मोजली जातात.
पण मी मात्र ठरवले आहे. ज्याला जे वाटायचे ते वाटू दे. आपण आपला स्वभाव काही सोडायचा नाही.
खरे म्हणजे मी आणि माझा स्वभाव यात फारसे अंतर नाही.
जरी लोकांना दिसणारा मी नसलो, तरी मला जो दिसतो तोच आहे मी.
माझ्यातला मीच माझे विश्वरूप.
.jpeg)
Comments
Post a Comment